राज्यात शिंदे- फडणवीस यांच्याकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, सर्वसामान्यांना `आनंदाचा शिधा`देण्यात येत आहे. मात्र, या योजनेची प्रचंड चर्चा होत आहे. त्यावरूनच आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.टेंडर घाईघाईने काढले मग पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही लोकांना आनंदाचा शिधा का मिळाला नाही? असा सवाल त्यावेळी त्यांनी केला आहे.
काय म्हणाले दानवे?
आनंद शिधा या योजनेवर बोलताना दानवे म्हणाले की, सुरूवातीपासूनच या योजनेमध्ये काहीतरी काळबेरं असल्याची शंका होती. कारण अवघ्या तीन दिवसांत या योजनेचे टेंडर काढण्यात आले होते. तीन दिवसात टेंडर काढले मग किमान त्यानंतर पाच दिवसांनी सर्वसामान्यांना हा आनंदाचा शिधा मिळणे अपेक्षित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दिवाळी उजाडली तरी अजूनही अनेकांच्या हाती हा आनंदाचा शिधा पडलेला नाही. नेत्यांच्या फोटोसाठी हे वाटप आधी रखडले. आता काही भागात शिधा पोहचत आहे, तर त्यातून एक-एक वस्तू गायब झाली आहे. रवा आहे तर तूप नाही, तेल आहे, तर डाळ नाही, असे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला आहे. औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलतांना अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.