मुंबई : भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मराठमोळा दीपोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे. बुधवारपासून या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. परंतु, भाजपच्या दीपोत्सवात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचे दिसून आले आहे. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते सचिन अहिर यांनी ट्विटद्वारे टीका केली आहे. हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, असा थेट सवालच त्यांनी भाजपला विचारला आहे.
वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपच्या मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी संगीतोत्सवाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक राहुल देशपांडे यांचाही कार्यक्रम होता. परंतु, राहुल देशपांडे यांचे गायन सुरु असतानाच बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आल्याने त्यांना कार्यक्रम थोडा वेळ थांबवण्यास सांगितला. यावरुन राहुल देशपांडे चांगलेच चिडलेले दिसले. यानंतर काही सेकंदातच टायगर श्रॉफचा सत्कार करुन कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला.
यादरम्यानचा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून सचिन अहिर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा, अशी टीका त्यांनी केली आहे.
सचिन अहिर म्हणाले की, याआगोदर हे उत्सव भाजपने का नाही केले. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम आयोजित केले जाते. नंतर कुठे हे दिसत नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपच्या दीपोत्सवात मराठी कलाकारांचा अपमानाप्रकरणी आता विरोधक आक्रमक झाले असून भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही अहिर यांचे ट्विट रिट्विट करत मानापमान? असे लिहीले आहे.