उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप आहे. या रॅलीमुळे नाशिक शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात होणारी वाहतूक त्याचप्रमाणे जिल्ह्यातून येणारे मराठा बांधव यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शांतता रॅलीचा समारोप हा नाशिकमध्ये होणार त्यानंतर जाहीर सभा देखील होणार आहे. शाळेचा उद्याचा सुट्टीचा दिवस इतर दिवशी भरून काढला जाणार आहे.
नाशिकच्या तपोवन येथून निमानी, रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय,शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्तीय भागातील सीबीएस चौक या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभेने रॅलीचा समारोप होणार आहे. नाशिकच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.