महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. मनोहर जोशींचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करु लागले. त्यांच्यात शिक्षणाची जिद्द फार होती. त्या परिस्थितीवर मात करत ते शिक्षक झाले. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी केली आणि किर्ती महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. मुंबई महापालिकेमध्ये त्यांनी क्लार्कचीही नोकरी केली.
मनोहर जोशींनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला. मनोहर जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले. त्यानंतर महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. नगरसेवक, विधानपरिषद सदस्य, मुंबईचे महापौर, विधानसभा सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार अशा अनेक पदांवर काम केलं आहे.