अनेक दिवसांपासून देशभरात काँग्रेस अध्यक्ष पदावरून रान उठले होते. वेगवेगळे वाद झाल्यानंतर आज शेवटी काँग्रेसला 22 वर्षांनंतर नवे अध्यक्ष मिळाले आहे. शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात निवडणुक झाल्यानंतर आज मल्लिकार्जुन खरगे यांचा बहुमताने विजय झाला आहे. या विजयानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर खरगे यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ''काँग्रेस अध्यपदाच्या निवडणुकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी पक्षाचे प्रतिनिधी, नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊन काँग्रेसला बळकट केलं आहे.'' माझे साथी शशी थरूर यांना मी शुभेच्छा देतो. कारण निवडणुकीत आम्ही दोघे प्रतिनिधी म्हणून उभे होतो. 'शशी थरूर मला येऊन भेटले. त्यांची भेट घेऊन पक्षाला पुढे कसे न्यायचे यावर चर्चा केली.' मात्र निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली, असे ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, सोनिया गांधी यांचे मी आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रात दोनदा सरकार स्थापन केले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसने या देशातील लोकशाही मजबूत केली असून संविधानाचे रक्षण केले आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. त्यांच्या संघर्षात देश सोबत उभा आहे. राहुल गांधी यांच्याशी संवाद झाल्यानंतर त्यांनी माझे अभिनंदन केले आणि मी काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार असल्याचे सांगितले. काँग्रेसमध्ये सर्व समान आहेत. आपण सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करावे, पक्षात कोणीही लहान-मोठा नसतो. जातीयवादाच्या नावाखाली लोकशाही संस्थांवर हल्ला करणाऱ्या फॅसिस्ट शक्तींविरुद्ध आपल्याला एकजुटीने लढायचे आहे. असे मत त्यांनी यावेळी मांडले.