मुंबई : राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election) अवघे चारच दिवस शिल्लक राहिले असून उमेदवारांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीने (MahaVikas Aghadi) कंबर कसली आहे. यासाठी आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्याची बैठक वर्षा निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची प्रशिक्षण कार्यशाळा होणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.
राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीविषयी सांगताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. नेमके मतदान कसे करायचे, पहिल्या पसंतीची मत, दुसऱ्या पसंतीची मत याबाबत कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सभेसाठी प्रेफारेन्स मतदान असतं. त्यामुळे त्यात थोडीही चूक चालत नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या दीकेवर बाळासाहेब थोरात म्हणाले की, इतक्या छोट्या व्यक्तीने शरद पवार यांच्याविषयी बोलू नये. राज्यातली ती इतकी मोठी व्यक्ती आहे त्यांच्या बदल बोलताना विचार करावा, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज्यात तब्बल २४ वर्षानंतर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत होणार आहे. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर, सहा जागांसाठी शिवसेनेनं दोन, काँग्रेसनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि भाजपनं तीन उमेदवार असे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.