मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाकडून होणारी ७ सदस्यांचे घटनापीठ नेमण्याची मागणी फेटाळली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
फक्त नबाम रेबिया या प्रकरणाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवा ही मागणी योग्य नव्हती. न्यायालयाने आम्ही मेरिटवर या प्रकरणाची सुनावणी करू असं सांगितलं आहे. आम्हाला देखील वाटत होतं की उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढू धोरण राबवत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. त्यासाठीच त्यांनी विस्तारीत घटनापीठाची मागणी केली होती. मात्र, आता अशी स्थिती राहिली नाही. नियमित सुनावणी होईल आणि अंतिम निकाल लवकर लागेल. आजच्या निर्णयाने आम्ही समाधानी आहोत, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.
दरम्यान, रेबिया प्रकरणाच्या पात्रतेवर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. 21 फेब्रुवारीला इतर मुद्द्यावर कोर्टात युक्तीवाद केला जाणार आहे.