छगन भुजबळ यांनी सभागृहात एक मेसेज वाचून दाखवला. जगजेते विश्वनाथन आनंद यांनी आजपर्यंत जगातील सर्व खेळाडूंचा पराभव केला आहे. परंतु, विश्वनाथन यांनी अमित शाह यांच्यासोबत खेळण्यास नकार दिला. कारण ते म्हणाले, अमित शहा एकच डाव टाकतात की सोंगट्या कुठे जातात ते कळतच नाही. यामुळे मी खेळू शकत नाही, असा टोला भुजबळांनी लगावला आहे.
आम्हाला धोका दिला पण मुंबईला धोका देऊ नका असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला केले आहे. आरेचे जंगल मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आरेच्या जंगलाचा प्रश्न नसून त्याठिकाणी असलेल्या जैवविविधतेचाही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आमचं सरकार पडल्यानंतर आम्हाला हे वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी तर रडायला लागली. गिरीश महाजन यांचं रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचा पाणी पुसायला तो त्यांनी वापरला. भाजपच्या आमदारांनीच सांगावं हे कसं काय झालं?एकनाथ शिंदे यांनी मला जर कानात सांगितलं की अडीच वर्षे झाली आहेत आता मला मुख्यमंत्रीपदावर बसायचं आहे तर मी उद्धव ठाकरेंशी बोलून तुम्हाला तिथे बसवलं असतं. अजित पवारांनी हे वाक्य उच्चारताच एकच हशा पिकला.
शिवसेना आणि भाजपचे सरकार आलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आलं आहे. माझ्यासोबत 8 मंत्री होते. माझ्या 50 सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला, असे ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेत सासरे सभापती, तर विधानसभेत अध्यक्ष जावई असा प्रकार झाला. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. आता नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले.
विरोधात मतदान केलेल्या शिवसेना आमदारांची मतं रेकॉर्डवर घेतली. हंगामी अध्यक्षांनी राहुल नार्वेकर विजय झाल्याची घोषणा करताच भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांनी जय श्रीराम, शिवाजी महाराजांची जय, भारत माताची जय अशा घोषणा दिल्या.
सपाचे आमदार मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. आबू आझमी आणि रईस शेख तटस्थ राहिले. एमआयएमचे सदस्य तटस्थ राहिले. मनसेच्या राजू पाटील यांनी भाजपला मतदान केले.
भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. नार्वेकर यांना 145 पेक्षा जास्त मते मिळाल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला. शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेकडून जारी करण्यात आलेला व्हिप झुगारला. या बंडखोर आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले.
सर्वात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून शिंदे गट आणि भाजपच्या मतमोजणीस प्रारंभ झाला.
विधान सभा अध्यक्षपदासाठी आवाजी मतदानाचा निर्णय हंगामी अध्यक्षांनी घेतला. परंतु विरोधकांनी मतदानाची मागणी केली. यामुळे मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जयंत पाटील यांनी राज्यपालांचे आभार मानत सांगितले की, अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या काम आज केले. आता आम्ही पाठवलेल्या 12 आमदारांची यादी त्यांनी मंजूर करावी. यामुळे राज्यपाल निष्पक्ष आहे, हा संदेश जाईल.
सुरुवातीला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करुन विधान सभा अध्यक्षाच्या कामकाजास प्रारंभ झाला.
राष्ट्रवादीचेही दहा ते बारा आमदार हॉटेल ओबेराय इथं मुक्कामी होते. आता ते विधान भवनकडे निघालेले आहेत. त्यांची स्वतंत्र व्यवस्था होती असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
सर्व बंडखोर शिवेसना आमदार विधान भवनात दाखल झाले आहे. विजयी मुद्रा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनात आले. त्यांच्यांसोबबत सर्व समर्थक आमदार होते. या आमदारांनी भगवे फेटे परिधान केले आहे. एकूण 51 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
Maharashtra assembly speaker election Live updates : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात सामना रंगणार आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी उमेदवारी आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी व्हिप जारी केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीचे प्रत्येक अपडेट जाणून घ्या...