शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर ठाकरे गटाला नवे नाव व चिन्ह मिळाले. परंतु, शिंदे गटाला नाव मिळाले असले तरी चिन्ह मिळाले नव्हते. अखेर आज संध्याकाळी शिंदे गटाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहे. ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. यावरून अनेक राजकीय मंडळीकडून या चिन्हावर प्रतिक्रिया येत आहे. त्यावरच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला आता हे चिन्ह नव्याने पोहचवण्याची आवश्यकता नाही. असे विधान यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे ट्वीट
आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार.... सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार.... #बाळासाहेबांची_शिवसेना असे ट्वीट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी चिन्ह मिळाल्यानंतर केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिले. त्यावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना आहे. सूर्य या चिन्हाला आम्ही पहिली पसंती दिली होती. परंतु, निवडणूक आयोगाने आम्हाला ढाल-तलवार हे चिन्हं दिलं. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेलं ढाल-तलवार हे चिन्ह मराठमोळी निशाणी आहे, ढाल-तलवार ही मराठमोळी निशाणी आधीच प्रत्येकाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे आम्हाला आता हे चिन्ह नव्याने पोहचवण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिली आहे.