राज्यात एकीकडे अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होईल अशी चर्चा होत असताना, त्याचत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृहाला भेट दिली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. दोन्ही नेत्यांनी या भेटी दरम्यान 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा गुलदस्त्यात असल्याने वंचित आणि शिंदे गट एकत्र येणार का? हा प्रश्न अंधातरीच राहिला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट झाली. दोन्ही नेत्यांनी या भेटी दरम्यान 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा केली. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र आणखीही गुलदस्त्यात आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. तसेच या भेटीने राज्यात कोणतंही नवं राजकीय समीकरण निर्माण होणार नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचं ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन पाहिलं. त्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी 15 मिनिटं चर्चा केली. यावेळी इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकावरही चर्चा करण्यात आली.
भेटीनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री?
या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूत आल्यावर एक वेगळंच समाधान लाभलं. या वास्तूत बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू, त्यांचं ग्रंथालय अजूनही जसंच्या तसं आहे. त्यांचा टेबलही आहे तसाच आहे. ही वास्तू बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे या इमारतीला पिल्लर नाहीत. हा सर्व आपला ऐतिहासिक ठेवा आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली. पण इंदू मिल स्मारकाबाबत चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेटीमागे कोणतंही राजकारण नाही. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. बाबासाहेबांची वास्तू पाहणं हाच भेटीचा हेतू होता. ही निव्वळ सदिच्छा भेट होती, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटीबाबत स्पष्ट केले आहे.