राज्यात दिवाळी सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज गडचिरोलीत पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली आहे. त्यांनी छत्तीसगडच्या बॉर्डरवरील जंगलात येऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. तसेच जवानांशी संवाद साधला.
आधीच्या सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा गडचिरोलीत आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांना इशारा देतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नाव न घेता टोला लगावला. मला भीती असती तर मी गडचिरोलीत आलोच नसतो. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. परिस्थितीला तोंड देण्याचे काम केले आहे म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी एका प्रश्नाला दिले आहे.
आपले जवान कसे काम करतात, कोणत्या परिस्थितीत करतात हे पाहिले पाहिजे. तसेच जवानांच्या पाठी सरकार खंबीर आहे हा मेसेज गेला पाहिजे. आपले जवान आणि गृहखाते नक्षल्यांना मुँह तोड जवाब द्यायला तयार आहे. या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असतो. गेल्या काही वर्षात नक्षलवाद कमी होत आहे. आपले जवान काम करत आहेत. त्यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. आपल्याला आपल्या बॉर्डरही सेफ करायच्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज्याच्या बॉर्डरचं रक्षण करत आहेत, स्वत:चा जीव धोक्याक घालत आहेत, त्यांना सण उत्सावाचा आनंद मिळत नाही, आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कर्तव्य बजावत असतात, त्यामुळे भेटायला आलो आहे. त्यांच्याशी संवाद साधायला आलो आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आलो, मी गेले पाच वर्ष पालकमंत्री असतानाही आपल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आज मुख्यमंत्री असताना दिवाळी साजरी करायला आलो त्याचा आनंद आहे, अशी भावनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.