विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे भेटीची वेळ देत नसल्याचं सांगत महंत सुनील महाराजांनी राजीनामा दिला आहे.
महंत सुनील महाराज कारंजा आणि दिग्रस मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महंत सुनील महाराज म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे मेसेज टाकले की, पक्षवाढीकरीता, समाजाच्या हिताकरीता मला आपणाला भेटायचं आहे. त्यांच्या पीएंनासुद्धा फोन केले की, आपण मला वेळ द्या. पण गेल्या दहा - बारा महिन्यांपासून मला वेळ मिळत नाही.
तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी बंडखोरी झाली तो खरोखरच बाळासाहेब यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे माझ्या लक्षात आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही. मातोश्रीवर मी भेटायला गेलो तिथे आम्हाला प्रवेशसुद्धा देत नाहीत. यावरुन हे लक्षात आलं माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ आपल्या समाजाला आणि महंताला स्थान नाही. म्हणून आमचा स्वाभिमान दुखवल्यागेल्यामुळे, आमचा आत्मसन्मान दुखवल्यागेल्यामुळे आम्ही आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा राजीनामा देते आहोत. असे महंत सुनील महाराज म्हणाले.