छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या सभेवर सावट निर्माण झाले आहे. सभा होणार की नाही याबाबत साशंकता भाजपकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु, पोलिसांनी एकूण 15 अटी घालत सभेला परवानगी दिली आहे. यामुळे ही सभा होणारच असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल घडलेल्या घटनेनंतर मविआ पक्षांच्या सभेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते. संभाजीनगर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या सभेला 15 अटींवर मंजूरी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत उध्दव ठाकरे, नाना पटोले आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. पहिल्यांदाच महाविकास आघाडीची संभाजीनगरात संयुक्त सभा होत आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्व प्राप्त झाले आहे.