मुंबई : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली असून कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीने निवडणूक लढवण्याचा दावा केला आहे. यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु, जयंत पाटील, नाना पटोले आणि सुभाष देसाई यांची बैठक झाली. यामध्ये ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच, उद्या अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचेही मविआकडून सांगितले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन जागेसंदर्भात आढावा घेतला. आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. उद्या आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. आज आम्ही तीन पक्ष चर्चा केली. आमचे जे इतर घटक पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा करू. याशिवाय आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर आमचा निर्णय जाहीर करू. तर, महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार. दोन्ही जागा मविआ च्या कशा निवडून येतील यासंदर्भात चर्चा केली आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही या पोटनिवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शिवसेना मागे येते पुढे येते असं काही नाहीये. दोन्ही जागा मविआ निवडून आणणे आमचे प्राधान्य आहे. आमच्या दोन गट नाही आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत काय स्थिती होती याचा आढावा घेतला. आम्ही उद्या निर्णय घेऊ, असे सुभाष देसाई यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी अवघे 25 दिवस राहिले असले तरीही अद्याप कोणत्याच पक्षाकडून अधिकृत उमेदवार घोषित झालेला नाही. यामुळे उमेदवारीबाबत इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. तरीही इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.