बीडच्या राजकारणात खळबळ माजवून देणारी बातमी काल समोर आली. शिवसेना ठाकरे गटाकडून काल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावरच आता क्षीरसागर कुटुंबाकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘बीडच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणे हे गैर नाही,’ असे क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर म्हंटले आहे.
नेमकं काय म्हणाले योगेश क्षीरसागर?
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची हक्कालपट्टी केल्यानंतर त्यावर बोलताना जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे म्हणाले की, जयदत्त क्षीरसागर हे बाहेरगावी आहेत. ते परत आल्यानंतर या हकालपट्टीच्या निर्णयावर परिवारातील ज्येष्ठ आणि आमच्याबरोबर काम करणारे सहकारी यांच्या चर्चा करून काय करायचे? याबाबतची पुढची दिशा ठरवू. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर काही आरोप करून कारवाईचे सांगितले. ‘बीडच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणे हे गैर नाही, असे विधान त्यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, आमच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. विकासाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बीडकरांच्या हिताच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही गेलो. आम्ही काही स्वतःचे प्रश्न घेऊन गेलो नाही तर जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो. विकासकामांसाठी पक्षीय बाधा कुठे नसावी, असे राजकारण आमचा परिवार करत आला आहे. अशी सविस्तर प्रतिक्रिया योगेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली.