किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट सोमैया यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय.
विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण सभागृहात उपस्थित केले होते. या प्रकरणी सभागृहात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
मात्र त्यासंदर्भातली चौकशी पूर्ण झालेली नसताना आता ज्या लोकशाही चॅनलने बातमी दाखवली त्यांच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. तो तपास आता सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आलाय.