मुंबई : भाजप नेते किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहे. तर, सोमैय्यांच्या व्हिडीओची दखल आधिवेशनातही घेण्यात आली असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अशातच, सोमैय्यांनी एक ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट आता चर्चेत आले आहे.
आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिध्द झाल्यानंतर किरीट सोमैय्यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीले होते. यामध्ये एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी, अशी विनंती सोमैय्यांनी फडणवीसांना केली आहे.
यानंतर, पुन्हा एकदा सोमैय्यांचे ट्विट चर्चेत आले आहे. आज जम्बो कोविड सेंटर बांधण्याचं कंत्राट ‘ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी’ला देण्यासंबंधीत फाईलची आरटीआय अंतर्गत तपासणी केली. तसेच एमएमआरसीएल (MMRCL) मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.
दरम्यान, किरीट सोमैय्यांच्या व्हिडीओवरुन अधिवेशनात आज अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी आक्रमक होत कारवाईची मागणी केली होती. याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना महत्वपूर्ण घोषणा केली. हा विषय नक्कीच गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशा प्रकारच कोणतही प्रकरण दाबणे, लपवणे, मागे टाकणे असं काहीही केलं जाणार नाही, असे फडणवीसांनी म्हंटले आहे