मुंबई : भाजप नेता किरीट सोमैय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर, ठिकठिकाणी आंदोलनं केले जात आहेत. या बातमीचे पडसाद आज सभागृहातही पाहायला मिळाले असून विरोधकांनीही सोमैय्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आता या बातमीची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली असून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.
किरीट सोमैय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओबाबत राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहीले आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे. विविध सामाजिक संस्थाकडून सदर व्हिडिओ बाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे. तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, किरीट सोमैय्यांच्या व्हिडीओवरुन अधिवेशनात आज अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी आक्रमक होत कारवाईची मागणी केली होती. याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना महत्वपूर्ण घोषणा केली. हा विषय नक्कीच गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशा प्रकारच कोणतही प्रकरण दाबणे, लपवणे, मागे टाकणे असं काहीही केलं जाणार नाही, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.