आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. या मतमोजणीकडे काँग्रेस, भाजपसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूचे होते. तोच कल आता मतमोजणीतही दिसून आला आहे. हा कल शेवटपर्यंत असाच राहिल्यास काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल असेच दिसत आहे. याच दरम्यान आता कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले काँग्रेस अध्यक्ष?
कर्नाटक विधानसभा निवडणुकी काँग्रेस सध्या चांगल्या परिस्थितीत आहे. यावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे म्हणाले की, 'काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू. मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, मी सिद्धरमय्या, सर्व आमदार आणि राज्यातील माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. त्यांनी जबाबदारी घेऊन बुथ पातळीवर काम केलं. हे कुणा एका व्यक्तीच्या कामाचं यश नाही. मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मी नंतर भारत जोडो भवन येथे येऊन या सर्व गोष्टींवर बोलेन. असे ते म्हणाले.