मुंबई : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 दिवसांत 22 रुग्ण दगावल्यानं खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यातील शिवाजी हॉस्पिटलमध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे. श्रीराम जयराम, अशा शब्दात आव्हाडांनी रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.
आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.