मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील एका प्रचार सभेत भाजपला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवून आणतो, असं आश्वासन दिलं होतं. यावरुन विरोधक आता आक्रमक झाले असून टीकास्त्र डागलं आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही अमित शाहांवर जोरदार टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या असल्या बातम्या पाहिल्या की माझा विश्वास अजूनच दृढ होतो, भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत बाकी काही नाही. श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरलंय. शाह यांचं हे विधान देशभरातील, जगभरातील तमाम हिंदूंचा अपमान करणारं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, संपूर्ण जगात हिंदू बांधव पसरलेत. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मध्य प्रदेशच्या जनतेला मोफत दर्शन घडविण्याचे आमिष दाखवलं जातंय. वास्तविक पाहता, श्रद्धा हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्याचा असा बाजार मांडणं हे जगभरातील रामभक्तांच्या श्रद्धेशी, भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे, असेही आव्हाडांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते अमित शाह?
काँग्रेसने नेहमीच आपल्या तीर्थक्षेत्रांचा आणि भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिर बांधले, काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधला, त्याचबरोबर सोमनाथ मंदिर सोन्याने बनवले जात आहे. पंतप्रधानांनी बद्रीनाथ धाम आणि केदारधामचेही पुनरुज्जीवन केले. रामलल्ला ५५० वर्षांपासून अपमानित अवस्थेत होते. काँग्रेस ७० वर्षांपासून राम मंदिराच्या कामात अडथळे आणत होता आणि विलंब करत होता, अशी टीका अमित शाहांनी कॉंग्रेसवर केली होती.