संजय देसाई | सांगली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. अशातच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येत आहे. वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांचा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आले होते. अशातच, आता कॉंग्रेस नेत्यानेही जयंत पाटील पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे संकेत दिले आहेत.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्येकर्त्याने बॅनर लावले होते. या बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला असून यामुळे याची राज्यभर चर्चा होत आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. परंतु, कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनीही सूचक विधान केले आहे.
राजकारणात काहीही होऊ शकत, जयंत पाटील यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर आमच्या सदभावना, सदिच्छा नेहमी त्यांच्या पाठीशी असतील, असं वक्तव्य देशमुख यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आयबीएफ या उद्योजक प्रदर्शनाचे उदघाटन अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर देशमुख हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमधील गृहकलह संपला आहे. सर्वजण आपापल्या कामाला लागले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण सुरु असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. यामध्ये अजित पवार आणि जयंत पवार असे दोन गट असल्याच्या चर्चा आहेत. अशातच, जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा उल्लेख केल्याने संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी दिवसांमध्ये राजकारणात नवे नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.