पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेणार आहेत. अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंदर्भात ही सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. निवडणूक आयोग आमची बाजू ऐकून घेत नाहीये, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.
शरद पवार साहेबांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं की आमची बाजू ऐकून घ्या. सहा ऑक्टोबरला सुनावणी होत आहे. आमची बाजू योग्य रीतीने मांडू. निवडणूक आयोग आमची बाजू ऐकून घेत नाहीये. भारताच्या इतिहासात जे संस्थापक अध्यक्ष असतात त्यांचाच पक्ष असतो. पण, काही लोक पक्ष आमच्या ताब्यात आला असल्याचे अविर्भाव मानतात. राज्यात आणि देशात राजकीय पक्ष पळवण्याची आणि चोरण्याची पद्धत नव्याने सुरू झाली आहे. निवडणूक आयोग सुजान योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
एका व्हिडिओमध्ये अजित पवार असं सांगत आहेत की मनसेचा एक सदस्य गेला तर मनसे पक्ष त्याच्यासोबत जाईल का? आणि अजित पवारांचे हे विधान योग्यच आहे. अजित पवार नेहमीच खरं आणि योग्य बोलतात. अजित पवारांची भूमिका देखील निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावी, असा खोचक विधानही त्यांनी केले आहे.
तर, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका सर्वांचीच आहे. मंत्रालयात जी आकडेवारी भुजबळ यांनी मांडली असेल ती लक्षात घ्यावी. सरकार खरच ओबीसींवर अन्याय करत आहे. सरकारने ओबीसी व अन्याय करू नये हीच भूमिका भुजबळ यांनी मांडली असावी. मंत्रालयात ओबीसींची संख्या कमी आहे असं मला देखील वाटतं. देशात जातीनिहाय सर्वेक्षण व्हायला पाहिजे हीच आमची मूळ मागणी आहे. मात्र, भाजपा हे करत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात प्रचंड बेकारी आहे. लाखो तरुण बेरोजगार आहेत. सरकार असे नको ते उद्योग करत आहे. नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरणं चुकीचं आहे. पदाचा दुरुपयोग होईल. मला असं वाटतं आता राज्य सरकारच कॉन्ट्रॅक्टवर द्यायला काही हरकत नाही, अशी टीकाही जयंत पाटलांनी कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने तहसीदार भरतीवर केली आहे.
दरम्यान, 16 आमदार अपात्रता सुनावणीबाबत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागतील. या सर्व आमदारांना पैलतीरी पोहोचवण्याचं काम राहुल नार्वेकर करत आहेत. हे ठरवून केलं जात आहे का? राहुल नार्वेकर योग्य तो निर्णय करतील पण त्यांनी निर्णय लवकर घ्यावा हीच आमची अपेक्षा, अशी टीकात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.