नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटील यांचं या अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे-फडणवीस सरकार निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, मी निर्लज्जपणा सारखे करू नका, असे आवाहन केले. मी माईक बंद करून बोललो होतो. विरोधी पक्षाचे आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा अमिरभाव पहिला आहे. 32 ते 33 वर्ष माझ्याकडून कधीही कुणाला अपशब्द वापरला गेला नाही. दुसरे प्रकरण टाळायचे होते म्हणून निलंबन केले. निर्लज्जपणा हा शब्द आपण सहजा सहजी वापरतो. कुणाचाही अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. आज निलंबन झालं, ठीक आहे, असे प्रसंग आयुष्यात येत असतात. महाराष्ट्राच्या जनतेच्या दारात जाऊन मुद्दे मांडू, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा निर्धार जयंत पाटीलांनी केला आहे.
दरम्यान, सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली. मात्र, विरोधी बाकावरून एका सदस्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणखीच आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली.