मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात आदिवासी समाज बांधवासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. याविरोधात आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने यवतमाळचे आमदार संदीप धुर्वे सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आदिवासी समाज बांधवांची माफी मागण्याची मागणीही धुर्वे यांनी केली.
नेमके काय घडले?
विधानसभेत आदिवासींच्या जमिनी बळकावण्याच्या मुद्द्यावर चर्चा चालू सुरु असताना जयंत पाटील यांनी म्हंटले की, देवस्थान जमिनीची चौकशी महिन्याभरात करू असे आश्वासन दिले होते. त्याचं काय झालं याचं उत्तर सरकारनं द्यावं. आदिवासी जमिनींच्या विक्रीचा प्रकार सर्रास घडतोय. बिचारे गरीब, अज्ञानी असतात. रात्रीचा त्यांचा कार्यक्रम झाला की ते शुद्धीतच नसतात. पण त्यामुळे त्यांची फसवणूक होते, ती अक्षम्य आहे. त्या जमिनींची किंमत हजार कोटींच्या घरात असते. त्यावर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? असं त्यांना विचारलं जातं. तो पुरावा आणायला गेला की ५-६ वर्षं लागतात. तोपर्यंत जमिनीवर कब्जा घेऊन प्लॅन पास होऊन खड्डे मारलेले असतात. बांधकाम उभं राहिलेलं असतं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
रात्रीचा कार्यक्रम या आव्हाडांच्या विधानावरुन संदीप धुर्वे आक्रमक झाले होते. कृपया असे शब्द वापरू नयेत. आदिवासी सुसंस्कृत समाज आहे. अशा समाजाला बदनाम करणं चुकीचं आहे. हे रेकॉर्डवरून काढलं जावं, अशी विनंती त्यांनी गेली. तसेच, आदिवासी समाज बांधवांच्या संदर्भात बोलताना स्वतःला आवरा, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. तसेच, आदिवासी समाज बांधवांची माफी मागण्याची मागणीही धुर्वे यांनी केली. अखेर समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असेल तर माफी मागतो, असे आव्हाडांनी म्हणत वादावर पडदा टाकला.