मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी सामना रंगताना पाहायला मिळत आहे. श्रावण बाळ योजनेच्या अंतर्गत मदतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांमध्ये जुगलबंदी रंगली होती. यादरम्यान जयंत पाटील यांनी मुश्रीफांना चिमटे काढले आहेत. मंत्री झाल्यानंतर टप्प्याने भूमिका बदलली आहे, असा निशाणा त्यांनी साधला.
मंत्री हसन मुश्रीफ यांची खासगीमध्ये मदतीची रक्कम वाढविण्यासंदर्भात बोलायचे. मात्र, मंत्री झाल्यानंतर टप्प्याने भूमिका बदलली आहे, असा टोला जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफांना लगावला आहे. मंत्री हसन मुश्रीफ मदतीच्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आमदारांना ५० कोटी, १०० कोटी दिले जात आहे. आमदारांना निधी देताना पैसे कमी पडत नाही. परंतु, गरीब लोकांना मदत दिली जात नाही. हे मंत्री होण्याअगोदर गरीबांच्या बाबत भूमिका मांडत होते. मात्र, मंत्री झाल्यावर धनिकांच्या बाजूला गेले आहेत, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या आक्रमकतेनंतर हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. श्रावण बाळ योजना सुरु करणारे आपले पहिलेच राज्य आहे. तरी जयंत पाटील यांच्या सततच्या मागणीनंतर मदतीच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, असे मुश्रीफांनी सांगितले आहे.