राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरून जुंपलेली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या जागांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. येत्या निवडणुकीत भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं ते म्हणाले होते. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
विधासभेच्या 288 जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, कारण तोपर्यंत शिंदे गट टिकेल असं मला वाटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. एकटा भाजप महाविकास आघाडीच्या समोर निवडणूक लढेल. देशभरात भाजपच्या वतीनं स्थानिक पक्ष संपवण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रात देखील हेच काम त्यांनी सुरु केलं. असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मित्र असो किंवा शत्रू त्यांना फोडणे, नामोहरम करणे आणि त्यांच्याकडे जाणारी मतं आपल्या बाजूला वळवून घेणे असा कार्यक्रम भाजपचा सुरु आहे. मला खात्री आहे की शिंदेंना ऐनवेळी सांगितलं जाईल की त्यांच्या चार ते पाच ठिकाणी जागा निवडून येऊ शकतात. कारण भाजप सातत्याने सर्वे करत आहे. उरलेल्या सर्व जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करेल. असे देखील पाटील म्हणाले.