बेळगाव : मराठी भाषिक (Maharashtra-Karnataka Dispute) महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत असतानाच, त्यांना महाराष्ट्रातून हवा तेवढा राजकीय पाठिंबा मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यातच लातूरचे आमदार धीरज देशमुख हे (Dhiraj Deshmukh) बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्याठिकाणी आपलं भाषण संपल्यानंतर धीरज देशमुखांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला. आणि या नाऱ्यावरुनच सीमाभागातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता किमान मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नये, अशा प्रतिक्रिया सीमाभागातून व्यक्त केल्या जाताहेत.
बेळगाव जिल्ह्यामधील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख आणि कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांना बोलावलं होतं.
या कार्यक्रमावेळी नेतेमंडळींनी भाषणंही केली. त्यात आमदार धीरज देशमुखांनी 'जय हिंद जय महाराष्ट्र' म्हणून त्यांचं भाषण संपवलं. पण आपण बेळगावात असल्याचं समजताच धीरज देशमुख परत माईकजवळ आले आणि त्यांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला.
आमदार धीरज देशमुखांच्या या नाऱ्यामुळं बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक नाराज झाल्याचं बोललं जातंय. धीरज देशमुखांनी जय कर्नाटकचा नारा देऊन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जातेय.