मुंबई : राज्यात सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. अशातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना कोठडी सुनावण्यात आलेल्या प्रकरणात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची महत्वाची भूमिका असल्याचा आरोप केला होता. यावर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले की, पत्राचाळ प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप केले आहेत. कृषिमंत्री असताना संजय राऊत यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत सरकार निर्णय घेईल, असे मत व्यक्त केले होते. या आरोपांचा आधार काय आहे. तो मला हवा आहे. देशात समजापुढचे प्रश्न बाजूला ठेवून अन्य पक्षांवर चौकश्या करण्याचा कार्यक्रम घेतला जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
यादरम्यान, जितेंद्र आव्हाड म्हणाले की, १४ ऑगस्ट २००६ बैठक झाली. १९८८चा प्रकल्प आहे. रहिवासी दारोदार भटकत होते. रहिवासी विरोधात बिल्डर असा तो वाद होता. या बैठकीत शरद पवारांनी अनेक प्रकल्पात मध्यस्थी केली आहे. यानुसार त्यांनी पत्राचाळ संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत गृहनिर्माण विभागाचे अधिकारी होते. मुख्यमंत्री हे त्या चर्चेत नव्हते. याप्रकरणी त्यांनी कोणतेही आदेश दिले नव्हते. या बैठकीचे इतिवृत्त आहे. चौकशी करणारी यंत्रणा काय बोलते व सरकारचे प्रतिनिधी यांमधील फरक स्पष्ट होतो. चौकशीला नाही म्हणण्याची भुमिका नाही. कितीही दिवसांत चौकशी करा. पण, आरोप सिद्ध झाले नाही. तर आरोप करणाऱ्यांबाबत भुमिका काय असेल तेही स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी शिंदे सरकारला दिले आहे.
दरम्यान, अतुल भातखळकर यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे शरद पवारांची चौकशीची मागणी त्यांनी केली होती. मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआाशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी पत्रात केली आहे, असे भातखळकरांनी गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहले होते.