औरंगाबाद : इम्तियाज जलील हा माणूस एमआयएमचा आहे पण वाटतो भाजपचाच, असे विधान आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, इम्तियाज जलील हे भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
औरंगाबाद येथे रेल्वे पीटलाइन आणि रेल्वेस्थानकाच्या नुतीनकरणाचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील रेल्वे विकास रखडण्याची कारणे निदर्शनास आणून दिली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी भाषणात इम्तियाज जलील यांना चिमटे काढले. ते म्हणाले, मराठवाड्यात रेल्वेचे जाळे कमी आहे हे इम्तियाज जलील तुम्ही केलेल्या मुद्द्याला मी सहमत असून निजमांना रेल्वेची गरज नव्हती. येत्या २०२३ पर्यंत देशातील बहुतांश रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण होऊन त्या धावू लागतील. दुहेरीकरणाचे काम देखील झपाट्याने सुरू आहे.
2009 ते 2014 पर्यंत 11 कोटी रुपये मिळत असत मात्र आता मोदी सरकार आल्याने रेल्वेने 11 हजार कोटी रुपये मिळाली. तसेच, यापुढे इम्तियाज जलील जेव्हा तुम्ही भाषण कराल तेव्हा या गोष्टी मोदी सरकारच्या रेल्वे मंत्र्यांनी केल्या हे सांगायला विसरू नका, असे दानवेंनी म्हंटले आहे. नाशिक, ठाणे, पुण्याच्या दर्जावर औरंगाबाद जात आहे. 180 कोटी खर्च करून औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन नवे बनविण्यात येणार आहे. वेरूळची लेणी रेल्वे स्टेशनला थीम असेल, अशी माहिती दानवेंनी दिली.
ते पुढे म्हणाले, तुमची आणि आमची दोस्ती पक्की आहे. इम्तियाज जलील हा माणूस एमआयएमचा आहे. पण, भाजपचाच वाटतो. सर्व मंत्री बनले. मी तुमच्या मंत्री बनण्याचा अर्धा हिस्सा आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. इम्तियाज जलील आता भाजपात प्रवेश करणार अशी अटकळे बांधली जात आहे. असे झाल्यास राज्याचे राजकीय समीकरण बदलेल यात शंका नाही. यावर आता एमएआएमची काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.