छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली. यावरुन आता राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबादचा काय संबध होता ते सांगा. महानतेवरून जर तुम्ही नाव बदलत असाल तर कोल्हापूरचे नाव बदलून छत्रपती शाहू नगर ठेवा. तर, मुंबईचे नाव छत्रपती शिवाजी महाराज महानगर असे करा, असा निशाणा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे. नामांतराविरोधात 27 मार्चच्या आधी मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी आजही औरंगाबादच्या नामांतराचा विरोध करत आहे. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देत आहेत तर माझे प्रश्न हे आहेत. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबादचा काय संबध होता ते सांगा. महानतेवरून जर तुम्ही नाव बदलत असाल तर कोल्हापूरचे नाव बदलून छत्रपती शाहू नगर ठेवा. पुण्याचं नाव बदलून फुलेनगर करा.
नागपूर शहराचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब नगरी ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज महानगर असे मुंबईचे नाव करा. मालेगावचे नाव मौलाना आबाद करा. व्हिक्टोरिया टर्मिनल येथील नाव काढून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देता. मात्र त्याचा या जागेशी काही संबंध नाही. तुम्ही राजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतला, अशी टीका जलील शिंदे-फडणवीसांवर केली आहे.
बाळासाहेब ठाकरे येथे आले कारण राजकारणाचे दुकान चालवायचं होत. महाराष्ट्रात औरंगाबाद तुम्हाला जमत नाही. परंतु, बिहार येथील औरंगाबाद कस चालतंय, त्या बिहारमधील औरंगाबादचा खासदार हा भाजपचाच आहे, मग ते नाव का बदलत नाहीत. औरंगाबाद येथील नामांतर मी नाही मानणार. या निर्णयामुळे फूट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
औरंगाबाद शहराचं पूर्ण नाव बदलायला कमीत कमी 1000 ते 1200 कोटी रुपये लागतील. जे माझं मत होतं तेच मत सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे. 27 मार्चच्या आधी छत्रपती संभाजी नगर या नावाचा विरोध करायला मोर्चा काढणार असल्याचेही जलील यांनी सांगितले.