राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ सध्या सुरु आहे. अशातच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला वाद आता वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना नेत्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. यामुळे कुठल्याही मुद्द्यावर एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाही. दरम्यान, शिंदे गटाचे उपनेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंची स्तुती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस राज्याला ब्लॅकमेल करणार आहात, असा थेट सावलच रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
उद्धव ठाकरेंनी भावनात्मक डायलॉ़गबाजी थांबवावी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असे सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असा सवालच थेट रामदास कदमांनी विचारला आहे. सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का, असा सवालही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
आता दौरे कशासाठी - कदम
सत्ता गेल्यानंतर बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मग सत्तेत असताना गेली अडीच वर्षात काय झाले होते, असे विधान कदम यांनी बोलताना केलं. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणही राज्याचा दौरा करणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहीर केले आहे.