सतेज औंधकर | कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी धर्मवीर ही पदवीच शंभूराजेंना योग्य आहे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर पदवी न लावण्याची भूमिका संभाजीराजेंची असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
इंद्रजीत सावंत म्हणाले की, शंभूराजे यांना धर्मवीर ही पदवी लावू नका अशी संभाजीराजे यांनीच यापूर्वी भूमिका मांडली होती. त्याऐवजी स्वातंत्र्यवीर म्हणा, असे संभाजीराजेंनी अनेक भाषणातून म्हंटले आहे. त्यामुळे संभाजीराजेंना आता सनातन की महाराष्ट्र धर्म यापैकी कोणता धर्म अपेक्षित आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
संभाजीराजे हे शाहू महाराजांचे वारस आहेत. त्यांना महाराष्ट्र धर्म चालवावा, हा शाहूनी सांगितलेला संदेश आहे. तो त्यांना अभिप्रेत असावा, असेही इंद्रजित सावंत यांनी यावेळी म्हंटले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच. तसेच, ते धर्माचेही रक्षक होते. म्हणून ते धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केलं, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचे असून, अर्धसत्य बोलले आहेत. स्वराज्यरक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मवीर नव्हते हे विधान साफ चुकीचं आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.