जळगाव : शिंदे गटातील मंत्री आणि नेते गुलाबराव पाटील हे त्यांच्या भाषणांमुळे अनेकदा प्रकाशझोतात येतात. अशाच, जळगावातील एका सभेत गुलाबराव पाटील यांच्या भाषणाची चर्चा रंगली आहे. गुलाबराव पाटील यांनी शोले चित्रपटातील लोकप्रिय संवाद बोलून दाखवत शिवसेनेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
गुलाबराव पाटील म्हणाले की, केंद्रात कोणाला मदत लागत असेल तर भाजपावाले आपले मोठे भाऊ तिथे उपस्थित आहेत. आम्ही शिंदे गटाचे लोक आहोत. आमचे दोन तुकडे झाले आहेत. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आ जाओ, अशी स्थिती आहे, असा डायलॉग त्यांनी बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. केंद्रात कोणाला मदत लागत असेल तर भाजपा येथे उपस्थित आहे. आम्हीपण त्यांच्याबरोबर युतीत आहोत. आमची तिथेही चंचू ताकद आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आम्हीही तुमच्यासारखे ओबीसी मात्र सध्या देशाचा व राज्याचे राजकारण हे त्यावरूनच चालला आहे. प्रत्येक समाजाने उठाव व आरक्षण मागाव ही स्थिती आहे. कधी कधी आम्हालाही भीती वाटते की उद्या देशाचं काय होणार, असे गुलाबराव पाटलांनी म्हंटले आहे.
पोटाला जात धर्म पंथ नसतो हे मी ऐकले, लोकप्रतिनिधी होत असताना आम्ही सुद्धा छोट्या समाजामध्ये जन्माला आलो. राज्यात सध्या आरक्षणाशिवाय दुसरा विषय सुरू नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आम्हालाही सुद्धा सांभाळून बोलावं लागतंय. कुणाला आरक्षण द्या किंवा नका देऊ याला आमचा विरोध नाही, ज्याला आरक्षण द्यायचे आहे त्याला सरकारने आरक्षण द्यावे. हीच मानसिकता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.