जळगाव : शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. आम्ही पळपुटे नव्हतो. मी शिंदे गटात जाण्याआधी सांगायला गेलो होतो की हे दुरुस्त केलं नाही तर काहीतरी होईल मात्र ती ऐकण्याची मानसिकता असावी लागते. ठाकरेंना त्यांचा गर्व नडला, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.
सध्या शिंदे गटाच्या नेत्यांवर व आमदारांवर ट्रोल केलं जातं. मात्र, जे करायचं आहे ते बिंदासपणे करा. मी भगोडा नव्हतो मी जाऊन सांगून आलो होतो. मी जाण्याआधी सांगायला गेलो की हे दुरुस्त केलं नाही तर काहीतरी होईल. अजित पवार यांनी देखील पहाटे शपथ घेतली होती त्यांनाही दुरुस्त करून संध्याकाळपर्यंत आणता आलं. मात्र, हा जर प्रयत्न आमच्या नेत्यांनी केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. पण, कधी कधी ग (गर्व) फार नडतो. पस्तीस वर्षे एकाच घरात राहिल्यामुळे जास्त बोलायची इच्छा होत नाही मात्र वेळ येईल तेव्हा बोलेल, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
ज्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण करायची आपली संस्कृती नाही. मात्र योग्य वेळी आपण उत्तर देऊ. राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी आपण 40 पैकी 33वा आमदार म्हणून मी शिंदे गटात सहभागी झालो होतो. राजकारणात जे घडतं होतं त्याची पक्ष नेतृत्वाला आपण सूचना केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जर ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असेही गुलबराव पाटलांनी म्हंटले आहे.