मंगेश जोशी | जळगाव : मुख्यमंत्री केवळ फोटोशूटसाठी काम करतात, अशी टीका ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
इर्शाळगडावर जी घटना घडली त्या ठिकाणी मुख्यमंत्री फोटोशूटसाठी गेले होते का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला उपस्थित केला आहे. शरीर फिट नसतानाही चार तास गड चढून जाणारा महाराष्ट्रातील पहिला संवेदनशील मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही, असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. दरम्यान, सभा घेणे हे उद्धव ठाकरेंचे कामच असून त्यांनी सभा घेतली पाहिजे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. काहींना अनुभव आल्याने ते शिंदे गटात प्रवेश घेत असून महापालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येईल. तसे शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढेल, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.