नुकताच काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादेत बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून राज्यपालांचा जोरदार विरोध होत होता. विशेष म्हणजे राज्यातील भाजपचे बडे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कोश्यारी यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचं सांगत राज्यपालांना घरचा आहेर दिलाय. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटानेदेखील त्यांना घरचा आहेर दिला. राज्यपालांना पदावरुन पायउतार करा, अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरु लागलीय. मात्र, आता मोठी बातमी समोर येत आहे. विधान केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उत्तर भारतात नियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांनी अशाप्रकारचं विधान केलं. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल दिल्लीलीत भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची कानउघाडणी करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.