मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याने विरोधकांकडून राज्यपाल हटविण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची पाठराखण केली होती. अशातच, राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी विधानामुळे नव्हेतर कृतीमुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
मुंबईमध्ये लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाले आहेत. या हल्ल्याने मुंबई आणि देशाला मोठा धक्का बसला होता. यामध्ये हजारो जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले होते. या हल्ल्यातील शहीदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनीही शहीदांना अभिवादन केले.
परंतु, यादरम्यान राज्यपालांकडून गंभीर चूक घडली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर यांनी वीरांना अभिवादन करताना चप्पला काढल्या होत्या. राज्यपालांनी मात्र चप्पला घालूनच शहीदांना अभिवादन केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु झाला होता. राज्यपालांच्या विधानाचा सर्वच स्तरावरून जोरदार निषेध व्यक्त केला जात होता. तर, शिवसेनेकडून महाराष्ट्र बंदचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान हाय कमांडशी चर्चा करण्याची शक्यता होती.