मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज सुटका होणार आहे. याकरीता विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज नागपुरातून मुंबईला येणार आहेत. पण, शिंदे-फडणवीस सरकारने अजित पवार यांच्या तातडीच्या प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीचे काही नेते सरकारच्या प्रेमात आहे का, असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारले बीएसी मीटींग घेऊ. परंतु, मला मुंबईला जायचे आहे, असे त्यांना सांगितले असता मुख्यमंत्र्यांनी मला शासनाचे विमान दिले आहे. मी शासनाच्या विमानाने 1 वाजता मुंबईला जाणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख आज सुटण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना मुंबई बाहेर जाता येणार नाही. यामुळे ते अधिवेशनात सहभागी होण्याची शक्यता नाही. माझा व जयंत पाटील यांचाही मुंबईला जाण्याचा प्रयत्न आहे.
कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. तीन आठवड्यांच्या अधिवेशनाची आमची मागणी आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून अधिवेशन कालावधी वाढवण्याची मागणी आहे. तसेच, आज कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज मुंबईला येत असल्याने काँग्रेसचे अनेक सहकारी जाणार आहे व रात्री परतणार आहेत. यामुळे अधिवेशन वाढवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तर, 10 अधिकाऱ्यांवर सभागृहात कारवाई झाली आहे. महसूल, पोलीस व इतर विभागातील अधिकारी आहे. काही अधिकाऱ्यांनी लोक प्रतिनिधींचे अपमान केले असल्यास आम्ही निलंबनाची मागणी करतो. मात्र, काही चांगले अधिकारी निलंबित केले जात आहे हे दिसत आहे.
दरम्यान, 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. यानंतर अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. यामुळे अनिल देशमुखांची तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी सुटका होणार आहे.