संजय देसाई | सांगली : राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात मुख्य लढत आहे. अनेक बाजार समितीचे निकाल समोर आले आहेत. तर काही ठिकाणी अद्यापही मतदान सुरु आहे. अशात सांगलीच्या आटपाडी बाजार समिती निवडणुकीला गालबोट लागले आहे. मतदानादरम्यान भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची मतदान केंद्राबाहेर बाचाबाची झाली आहे. यादरम्यान पडळकरांनी ग्रामपंचायत सदस्यास मारहाण केली आहे.
सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान सुरु आहे. या मतदानावेळी भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि काळेवाडी गावातील एका सदस्यांमध्ये वादावादी झाली. दुपारी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होते.
दरम्यान, मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रकार घडला आहे.