नागपूर : सांगली जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून बँकेत अनेक गैरव्यवहार झालेले आहेत. नोकर भरतीचा प्रचंड मोठा घोटाळा या बँकेच्या माध्यमातून झालेला आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या जिल्हा बँकेची चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी आज सहकार मंत्र्यांनी मान्य केली. यानंतर पडळकरांनी आभार मानताना जयंत पाटलांवर टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, सांगली जिल्हा बँकेमध्ये जयंत पाटील यांच्या माध्यमातून बँकेत अनेक गैरव्यवहार झालेले आहेत. नोकर भरतीचा प्रचंड मोठा घोटाळा या बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. कर्ज अनिमितपणे वाटप न करणे, मॉर्गेज न घेणार काही कर्जांना अधिकारात बसत नसताना सुद्धा माफ करणं, असे अनेक विषय या बँकेच्या माध्यमातून झालेले आहेत आणि म्हणून या बँकेच्या चौकशीची मागणी आत्ताचे विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष करत आहेत. त्यांनीच मागच्या सरकारच्या काळात केली होती आणि मागील सरकारने चौकशी लावली होती. परंतु 23 सप्टेंबर 2021 ला एका पत्राद्वारे ही चौकशी स्थगित केली होती.
सहकार जोपासला पाहिजे. सहकार वाढला पाहिजे. सांगली जिल्हा बँक हे राजकारणाचा अंदाज आलाय त्यांना पाहिजे तशा पद्धतीने कर्ज देणार पाहिजे तशा पद्धतीने ते शटल करणार, अशा पद्धतीचं चुकीचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून चालू आहे. म्हणून मी सरकारला विनंती केली होती की ज्या चौकशीला तुम्ही स्थगिती दिलेले आहे ती स्थगिती उठवा आणि पुन्हा जिल्हा बँकेची चौकशी सुरू करा. आज सहकार मंत्री महोदयांनी सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि या चौकशीमधून निश्चितपणे ज्यांनी कोणी चुकीचे काम केलाय ते सगळं समोर येईल आणि त्यांच्यावरती योग्य उचित कारवाई होईल असा मला ठाम विश्वास आहे, असे पडळकरांनी म्हंटले आहे.