नवी दिल्ली : शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या ठाकरे गटाला आता आणखी धक्का मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील आशिष गिरी यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तर, सर्वोच्च न्यायालयानेही यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते बनले आहेत. यामुळे शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात यावा. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. आशिष गिरी यांनी कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. हे प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित असतानाही निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे आपला निर्णय दिला आहे. यामुळे शिंदे गट पक्षाचा निधी आणि कार्यालयावरही दावा करू शकतात, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. परंतु, निवडणूक आयोगच्या निर्णायावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच, याप्रकरणी 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे.