राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला नामिबियातून आणलेल्या चित्त्यांवर देशाचं लक्ष केंद्रित झाल आहे. या चित्त्यावरून भाजपवर प्रचंड टीका होत असताना, त्या चित्त्यावरून राष्ट्रवादी नेते माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. त्यावरच आता भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
ते म्हणाले की, बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात. महागाईचे, बेरोजगारीचे, कायदाव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे .. पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, याऐवजी वेदांताचे काय होणार ते सांगा? असा सवाल करत त्यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा होता.
अजित पवारांना बावनकुळेंचा प्रतिप्रश्न ?
चित्त्यावरून केलेल्या टीकेवर उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का?, आज मुंबई, महाराष्ट्राची काय स्थिती आहे. राज्याचा विकास नव्याने सुरु आहे. आता फक्त दोन महिने झाले काही काळ जाऊद्या बघा कश्या परिस्थिती मध्ये तुम्हाला महाराष्ट्र दिसेल. सध्या विरोधक बावचळलेल्या स्थितीत आहेत, म्हणून असे आरोप करत आहेत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. तेव्हापासून पेंग्विनसाठी लागलेल्या खर्चावरून भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.