अमोल नांदूरकर | अकोला : राजकारणात कोणतीच स्थिती कायम टिकून राहत नाही किंवा त्याबद्दलची शाश्वती देता येत नाही हेच खरे. शिवसेनेत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घडविलेल्या राजकीय भूकंपापासून आतापर्यंत अकोला जिल्हा बचावला होता. पण, आता माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांनी शिंदे गटाच्या मुंबईतील बैठकीस हजेरी लावल्याने हा गडही ढासळला. पक्ष कोणताही असो, राजकीय संबंध बिनसल्यानंतर एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाही त्याचाच हा प्रत्यय म्हणावा लागेल.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यापूर्वी तीनदा शिवसेनेतर्फे प्रतिनिधित्व करून यंदा पराभवास सामोरे जावे लागलेल्या गोपीकिशन बाजोरिया व शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख, आमदार नितीन देशमुख यांच्यातील वितुष्ट लपून राहिलेले नाही. किंबहुना आपल्या पराभवाला देशमुखच जबाबदार असल्याचा आरोप करीत बाजोरिया यांनी पक्षसंघटनेत बदलाची मागणी लावून धरली होती.
परंतु, पक्षप्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष करीत उलट देशमुख गटालाच झुकते माप देत पदाधिकाऱ्यांच्या नव्या निवडी केल्याने बाजोरिया अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. त्यांना आयताच शिंदे यांचा पर्याय लाभून गेला. काँग्रेस व राष्ट्रवादीतही सारेच मातब्बर म्हणवतात. पण, पक्ष नेतृत्व त्यात जसे बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न करते तसे शिवसेनेत होऊ न शकल्यानेही अशी स्थिती आकारल्याचे यातून दिसून यावे.
अखेर अकोला जिल्ह्यात शिवसेनेत खिंडार पडले असून माजी विधानपरिषद आमदार गोपिकीशन बाजोरिया शिंदे गटात सामील झाले आहेत. बाजोरिया यांचे पुत्रही यावेळी उपस्थित होते. नगरसेवक शशी चोपडे, नगरसेविका पती अश्विन नवले यांसह शिवसेना पदाधिकारी योगेश अग्रवाल, योगेश बुंदले शिंदे गटात सामील झाले असून युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरपसुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत.
अखेर अकोला जिल्ह्यातही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. यातून व्यक्तिगत कोणाला काय साध्य होईल हा भाग वेगळा आहे. परंतु, आगामी अकोला महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही फूट शिवसेनेला नुकसानदायी, तर भाजपला लाभदायी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.