मयुरेश जाधव,अंबरनाथ : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंबरनाथमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांना निवेदन दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी एका गँगस्टरला दिली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिलं होतं. यानंतर संजय राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये मात्र माझ्या तोंडाला काळं फासण्याचा किंवा मला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी माहिती दिली होती.
त्यामुळे संजय राऊत यांनी आधी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप करत केवळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची बदनामी करण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज शिवाजीनगर पोलिसांची भेट निवेदन सादर केलं. यावेळी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.