मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना क्लीनचिट देताना अनिल देशमुखांना कोरोना झाल्यामुळे 6 ते 15 फेब्रुवारी रोजी ते रुग्णालयात होते. तर, 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असा दावा केला. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा हा दावा फेटाळला आहे.
15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 तारखेला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. आपल्या या म्हणण्याच्या पुष्टीसाठी त्यांनी 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओचे ट्विट जोडले आहे.
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. लता मंगेशकर आमचे दैवत असून सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्याने त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उदभवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर 12 इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही करत आहेत, असे अनिल देशमुख यांनी त्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.