खालिद नाझ | परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या विधानाचे समर्थन केले. यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांकडून सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
संभाजीराजे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे? हे मला कळत नाही. सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे. फडणवीसांनी कोश्यारी आणि त्रिवेदींची समर्थन करण्यापेक्षा ते माफी कशी मागतील, याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित काढण्यात आले आहेत. पण राज्यपालांच्यादेखील मनात असे कुठलेही भाव नाहीयत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही. तर, सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, आपण त्रिवेदी यांचे वक्तव्य नीट ऐकलेले आहे. यामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने महाराजांनी माफी मागितलीय, असे म्हटलेले नाही, अशी भूमिका मांडली.