राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरूनच आता माजी खासदार संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
काय म्हणाले संभाजी छत्रपती?
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच वाद निर्माण झाला आहे.त्यावरच बोलताना माजी खासदार संभाजी छत्रपती म्हणाले की, राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.
काय म्हणाले कोश्यारी?
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही.
महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असंही वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.