अमोल धर्माधिकारी | नाशिक : राज्यातील आज बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. महाराष्ट्रातून पहिला विजय हा स्वराज्य संघटनेला नाशिकच्या गणेश गावातून मिळाला असून रूपाली ठमके असे महिलाचे सरपंचाचे नाव आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे उमेदवार देण्यात आलेले होते. स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते.
नाशिक जिल्ह्यातील व नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले आहेत. त्यापैकी गणेशगाव येथे सरपंच पदासाठी रूपाली ठमके यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा तिथे विजय झाला आहे. याशिवाय राजेवाडी, गंगावरे-सावरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती.
रूपाली ठमके यांच्या रूपाने स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी फोनद्वारे रूपाली यांचे अभिनंदन केले आहे. स्वराज्य संघटनेचे नाशिक तालुक्यातील आणखी दोन सरपंच पदाचे उमेदवार आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. एकुण ३ सरपंच व २० च्यावर सदस्य निवडून येणार असल्याचे प्रवक्ते डॅा. धनंजय जाधव यांनी सांगितले.