देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. तसेच बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पुढे आलं होतं. याशिवाय इतरही राज्यातून अशाच प्रकारच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनांनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या घटनांवर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भाष्य केलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वत:ला कठीण प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. 12 वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही राष्ट्रपतींनी दिली.